पिंपरी (Pclive7.com):- तब्बल २१ लाख रुपये खर्चून स्पेनच्या बार्सिलोनामध्ये स्मार्ट सिटीच्या अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘स्मार्ट’ पदाधिकाऱ्यांचा दौरा सुरुवातीपासूनच वादात राहिला होता. स्वत: आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांबरोबर काढलेला ‘सेल्फी’ चांगलाच वादात सापडला होता. सर्वच स्तरातून या दौऱ्यावर टिकेची झोड उडाली. अखेर १५ दिवसानंतर हा दौरा शहराच्या फायद्याचाच होता असं सांगण्याचा ‘आटापिटा’ या स्मार्ट पदाधिकाऱ्यांनी आज केला.
बर्सिलोना दौऱ्याचा फायदा शहराला किती होणार हे सांगण्यासाठी दौऱ्यात सहभागी पदाधिकाऱ्यांनी महापौर कक्षात तातडीची पत्रकार घेतली. यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, अधिकारी राजन पाटील, निळकंठ पोमन उपस्थित होते.
सर्वच स्तरातून झालेल्या टिकास्त्रामुळे १५ दिवसांनी दौऱ्याचा नेमका फायदा काय झाला हे पदाधिकाऱ्यांनी सांगण्याचा ‘आटापिटा’ केला. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, हा दौरा केला म्हणजे आम्ही कोठे दरोडा टाकला नाही, किंवा चोरीही केली नाही. विरोधात असताना आम्ही दौऱ्यांना विरोध करायचो, परंतू सत्तेत आल्यानंतर आम्हाला व्हिजन आले आहे. या दौऱ्याचे फलित शहरासाठी चांगलेच आहे. शहराला फायदा होणार असेल तर दौऱ्यांना २० लाख नव्हे तर २ कोटी देखील खर्च करू.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, या दौऱ्यावर कोणताही चुकीचा खर्च झालेला नाही. शहर घडविण्यासाठी मौलिक असा हा दौरा ठरणार आहे. दौरा फायद्याचाच असून शहर स्मार्ट करण्यासाठी त्याची मोठी मदत होणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणी पुरवठा या सर्व महत्वांच्या गोष्टीला या दौऱ्याचा फायदा होणार आहे. अंमलबजावणी करणं कठीण आहे, परंतू अशक्य नसल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि मनसे गटनेते सचिन चिखले यांनी देखील सत्ताधाऱ्यांच्या होला हो मिळवत दौरा शहराच्या किती फायद्याचा हेच सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या दौऱ्यात शेवटच्या दिवशी सहभागी झालेल्या महापौर राहुल जाधव यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.
पिंपरी महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारे अभ्यास दौरे हा आता थट्टेचा विषय झाला आहे. अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद घेत मौजमजा केली जाते, हे उघड गुपित आहे. वर्षांनुवर्षे अशा दौऱ्यांची पिंपरी महापालिकेची परंपरा आहे. गेल्या दीड वर्षांत १६ दौरे झाले आहेत. मात्र, या दौऱ्यांचा उपयोग शहरासाठी वा शहरवासीयांसाठी झाल्याचे पाहावयास मिळत नाही. गेल्या आठवड्यात झालेला बार्सिलोना दौरा अशाच आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिपणीमुळे भलताच चर्चेत राहिला आहे.