नदी पात्रात भराव टाकून अतिक्रमण, झाडांची कत्तल; तातडीने कारवाई करण्याची मारूती भापकर यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड परिसरातील आदित्य बिर्ला रुग्णालयाजवळ पवना नदीच्या पात्रात बेकायदेशीर कामे सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केला आहे. खेळाचे मैदान विकसित करण्याच्या नावाखाली नदीपात्रात भराव टाकणे, झाडांची तोड करणे तसेच लहान झाडांना मातीखाली गाडण्याचे प्रकार सुरू असल्याने तातडीने कारवाई करण्याची मागणी भापकर यांनी केली आहे.

मारूती भापकर यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांच्या निवेदनानुसार, संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माती टाकून नदीपात्र अरुंद केले जात आहे. त्यामुळे पवना नदीचे नैसर्गिक प्रवाह आणि अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच नदीकाठावरील झाडांची तोड करून काही झाडांचे बुंधे मातीखाली दडपण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील जैवविविधतेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भापकर यांनी तातडीने संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेली कामे थांबवावीत, तसेच सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पवना नदी संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची गरज व्यक्त होत आहे.





















Join Our Whatsapp Group