पिंपरी (Pclive7.com):- आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत ‘इंद्रायणी’ थडी जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून कला, क्रीडा, उद्योजकता यांसह महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यात येणार आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात दिनांक ८ ते ११ फेब्रुवारी २०१९ असे चार दिवस ही जत्रा कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर भरवण्यात येणार आहे. सकाळी १० ते रात्री १० असा जत्रेचा कालावधी राहणार आहे.
आमदार लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे यांनी याकामी पुढाकार घेतला असून, भोसरी परिसरातील विविध बचतगटांच्या महिलांशी प्रभाग निहाय चर्चा केली जात आहे. त्याद्वारे अधिकाधिक महिला बचत गटांना सहभागी करुन घेण्याचे नियोजन केले आहे.
परिसरात महिला बचत गट आणि महिला स्वयंसेवी संस्थांचा या जत्रेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
भोसरीसह पिंपरी चिंचवड शहरातील तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचत गटांद्वारे, महिलांनी स्वत: तयार केलेल्या कोणत्याही उत्पादनांसाठी या जत्रेमध्ये स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. बचतगटांच्या विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरण चळवळीला चालना देण्यासाठी या जत्रेचे नियोजन केले आहे.
काय आहेत इंद्रायणी थडीची खासियत?
🛴 लहान मुलांसाठी बालजत्रा
🎼 महिलांसाठी भजन स्पर्धा
🍽 गावरान खाद्य महोत्सव
👩🏻⚕ महिला आरोग्य शिबीर
🚶🏻♀ फॅशन शो
💃🏻 डान्स स्पर्धा
💰 महिला उद्योजकता मार्गदर्शन
🎤 होम मिनिस्टर कार्यक्रम
🤼♀ महिलांसाठी पारंपरिक खेळ
🧩 महिलांसाठी जॉब फेअर
🧘🏻♀ योग व झुंबा ऐरोबिक्स प्रशिक्षण
📌 कसा कराल नि:शूल्क स्टॉल बूकिंग?
◼ इंद्रायणी थडी जत्रेकरिता महिलांसाठी स्टॉल बूकिंग करण्याची सुविधा नि:शूल्क आहे.
◼ परिसरातील अधिकाधिक महिला बचत गटांनी जत्रेत सहभागी व्हावे, हा हेतू आहे.
◼ स्टॉल बूकिंगसाठी महिला स्वतंत्र व्यवसाय करत असेल, तर स्वत:चे आधार कार्ड, पॅनकार्ड आवश्यक आहे.
◼ तसेच, बचतगटांसाठी बचतगटांचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच समाविष्ट महिलांची नावे व मोबाईल क्रमांक द्यावे लागणार आहेत.
◼ शितलबाग, भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्टॉल बूकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी संदीप ठाणेकर (७७२००४३८६०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
◼ दि. ३० जानेवारीपर्यंत स्टॉल बूकिंग करता येणार आहेत.
◼ कोणत्याही ब्रँडेड वस्तुंची विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध होणार नाहीत, असेही संयोजकांनी निश्चित केले आहे.
🎁 ‘लकी ड्रॉ’ जत्रेत दररोज १००० बक्षीसे
सन्मान स्त्री शक्तीचा…गौरव भारतीय संस्कृतीचा… अशा संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या इंद्रायणी थडी जत्रेमध्ये फक्त महिलांसाठी चार दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याद्वारे दररोज लकी ड्रॉ आणि विशेष सहभागी झालेल्या महिला अथवा महिला बचतगटांसाठी बक्षीस देण्यात येणार आहे.
दररोज सुमारे १ हजार बक्षीसांचे वितरण करण्यात येणार आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्याला आणखी बळकटी देण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या प्रमुख स्वीनल कपिल म्हेत्रे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group