पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डीचे नगरसेवक प्रमोद कुटे आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कुटे यांच्या मातोश्री कै. चारुशिला प्रभाकर कुटे आणि तीर्थरूप कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारी कुटे यांच्या पुण्यस्मरणार्थ ‘मातृ-पितृ स्मृती प्रीत्यर्थ’ आज (बुधवारी) भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध समाज प्रबोधनकार आणि कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

हा सोहळा बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणार आहे. सायंकाळी पाच वाजता इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला सुरुवात होईल. कै. मल्हारराव कुटे क्रीडांगण, ट्रीनिटी शाळेजवळ, विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे हा कार्यक्रम होणार आहे. कीर्तनानंतर सायंकाळी ७:०० ते १०:०० या वेळेत सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात स्वर्गीय कुटे दाम्पत्याच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), त्यांच्या सोबतीला स्वरांगधर्व ह.भ.प. ओंकार महाराज जगताप, उद्धव महाराज शिंदे, मृदंग महामेरु ह.भ.प. ओंकार महाराज कागदे आणि स्वरांगधर्व ह.भ.प. किरण महाराज शिंदे यांचेही सांगीतिक योगदान या सोहळ्याला लाभणार आहे.

नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कै. श्रीमती चारुशिला प्रभाकर कुटे आणि कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारी कुटे हे आपल्या समाजकार्य आणि परोपकारी वृत्तीमुळे आकुर्डी आणि परिसरात परिचयाचे होते. त्यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला हा कीर्तन सोहळा केवळ त्यांचे स्मरणच नव्हे, तर समाजाला ज्ञान आणि प्रबोधनाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, विठ्ठलवाडी, आकुर्डी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि महाराजांच्या कीर्तनातून मिळालेला ज्ञान उपयोगात आणावा, असे आवाहन कुटे परिवारातर्फे करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group