पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २३ पैकी २१ उमेदवारांची शिवसेनेकडून घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत मावळमधून श्रीरंग बारणे यांचेही नाव आहे. त्यामुळे मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे अशी लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे.
राजकीय वर्तुळासह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष मावळमधील लढतीकडे लागलं आहे. कारण मावळमधून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मावळमधून शिवसेनेकडून श्रीरंग बारणे हेच लढणार की नवीन उमेदवार दिला जाणार, याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता आता संपली आहे. कारण शिवसेनेने मावळमधून आपला उमेदवार जाहीर केला आहे.
सलग पाच वर्षे संसदरत्न पुरस्कार विजेते ठरलेले श्रीरंग बारणे यांना शिवसेनेने मावळमधून पुन्हा एकदा रणांगणात उतरवले आहे. त्यामुळे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यापुढे श्रीरंग बारणे यांचे कडवे आव्हान असणार आहे. विद्यमान खासदार विरुद्ध नवखा उमेदवार अशी लढत मावळमधून असणार आहे.
या लढतीत महत्वाची भूमिका ठरणारे ती म्हणजे पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचीच.. त्यामुळे जगताप युतीचा धर्म पाळणार की, प्रचारापासून अलिप्त राहणार यावर मावळच्या निकालाची समिकरणे अवलंबून आहेत.






















Join Our Whatsapp Group