पिंपरी (Pclive7.com):- ‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुक्त भारत’ असा नारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार महायुतीचे मावळ मधील उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरूरमधील शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात मनसैनिक घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत. मोदी यांची चुकीची धोरणे त्यांच्यामुळे होणारा त्रास पाच वर्षात त्यांनी एकही पूर्ण केलेले आश्वासन याची माहिती देणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात पदयात्रा दुचाकी रॅली कोपरा सभा मेळावे घेऊन शिवसेना भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे मनसेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मावळ आणि शिरूर मतदारसंघात मनसेची नेमकी काय भूमिका असणार याबाबतची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली. यावेळी शहराचे प्रभारी रणजित शिरोळे, गणेश सातपुते, किशोर शिंदे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, उपशहर अध्यक्ष अंकुश तापकीर, विद्यार्थी सेनेचे हेमंत डांगे, विशाल मानकरी, राजू सावळे आदी उपस्थित होते.
यावेळी किशोर शिंदे म्हणाले की, आमचा कोणालाही पाठिंबा नाही. आम्ही कोणाच्याही सभेत सहभागी होत नाही. मनसे स्वतंत्रपणे भाजप शिवसेनेच्या विरोधात प्रचार करत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात हाक दिली आहे. संपूर्ण राज्यभरात स्वतः राज साहेब जाहीर सभा घेऊन आपली भूमिका मांडत आहेत. पुणे जिल्ह्यातही मनसे याप्रमाणे कामाला लागली आहे. मोदी आणि शहा यांच्या सोबतच श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव का नको आहेत हे आम्ही जनतेला पटवून देणार आहोत.
पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभा, बैठका घेणार आहोत. शहरात प्रचाराची डिजिटल गाडी देखील येणार आहे. या माध्यमातून मोदी यांचा खोटारडेपणा जनतेसमोर आणणार आहोत. राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना भाजपाकडे उत्तर नाही. त्यामुळेच मनसेला भाजपचे ‘लावारिस भक्त’ ट्रोल करत आहेत. परंतु आम्ही त्यांना भीक घालत नसून जशास तसे उत्तर देत आहोत.
गणेश सातपुते म्हणाले की, मोदी आणि शहा मुक्त देश करायचा आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर न जाता स्वतंत्रपणे शिवसेना-भाजप युतीच्या विरोधात प्रचार करणार आहोत. मोदी यांच्या एकाधिकारशाहीमुळे होणाऱ्या त्रासाची जनतेला आठवण करून देणार आहोत. भाजपची भूमिका घराघरात जाऊन लोकांना समजून सांगणार आहोत. राज ठाकरे यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. म्हणूनच त्यांच्या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे.





















Join Our Whatsapp Group