पिंपरी (Pclive7.com):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या कोट्यातील महामंडळांच्या नियुक्त्या जाहीर करण्याला सुरुवात केली आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या महामंडळावर नियुक्त केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत. त्यामुळे ज्यांना पदे मिळाली नाहीत अशा कार्यकर्त्यांना महामंडळावर संधी देण्याचा निर्णय आज होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्राधिकरणाच्या रखडलेल्या सदस्य निवडी देखील मार्गी लागणार असल्याची चर्चा शहर भाजपात सुरू आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आले आहे. तसेच माजी पालकमंत्री गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून संसदेत गेले आहेत. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपतर्फे आज तीनही मान्यवरांचा सत्कार संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात दुपारी दोन वाजता होणार आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या कोट्यातील महामंडळांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यास वेग दिला आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहा महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली आहे. परंतु अद्यापही प्राधिकरणा वरील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी या नियुक्त्या जाहीर करण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज शहरात येत आहेत. त्यामुळे महामंडळावर कोणाची नियुक्ती करायची याची चाचणी होण्याची शक्यता आहे. ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांना एकही पद मिळाले नाही, त्या कार्यकर्त्याला पदे देणेबाबत विचार होऊ शकतो. प्राधिकरणाचा रखडलेल्या सदस्य निवडीचा मार्गदेखील मोकळा होऊ शकतो. आता प्रदेशाध्यक्ष दानवे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील याबाबत नेमका काय निर्णय घेतात याकडेच सर्व भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.






















Join Our Whatsapp Group