पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेच्या रिंगणात अपक्ष उभे राहिलेले शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल कलाटे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उभी राहील असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोेग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, पिंपरीचे उमेदवार अण्णा बनसोडे, भोसरीचे उमेदवार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, शकुंतला धराडे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, डब्बू आसवानी, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, रोहित काटे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत अनेकजण इच्छुक होते. अखेरीस मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे यांची नावे चर्चेत होती. परंतू त्यातून प्रशांत शितोळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. परंतु एबी फॉर्म पोहचण्यात उशीर झाला. त्यानंतर मी प्रशांत शितोळे यांच्याशी बोललो आहे. त्यांची मनधरणी करणार आहोत. पिंपरी चिंचवड शहरात सध्या अराजकता माजली आहे. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. भाजपकडून सत्तेच्या जोरावर अनेक चुकीची कामे सुरू आहेत. हे सर्व थांबवायचं असेल तर महायुतीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे होतं. म्हणूनच राष्ट्रवादीच्या वतीने राहुल कलाटे यांना जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल कलाटे यांना मी चांगला ओळखतो. त्यांच्या रूपाने चिंचवडला चांगले नेतृत्व मिळेल असा विश्वासही अजित पवार यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.