तळेगाव (Pclive7.com):- प्रेमगंध ध्यान साधना परिवार तळेगांव दाभाडे यांच्या पुढाकाराने प्रेमगंध परिवारातर्फे आयोजित एक दिवसीय निःशुल्क ध्यान साधना शिबीर नुकतेच नगरपरिषदेचा नवीन हॉल, मारुती चौक, तळेगांव दाभाडे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प.पु. गुरुदेव मनोजजी जैन यांच्या शुभ आगमनानंतर शिबिराची सुरुवात श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे सरदार, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, सरीकाताई सुनील शेळके, शांताबाई मोहन काकडे, माई जैन यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून व त्यानंतर प्रेमगंध च्या प्रार्थना व प्रतिज्ञे ने झाली.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही वेळात वेळ काढून शिबिराला उपस्थिती लावली. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रेमगंधच्या या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की आज माणसाकडे पैसा, प्रॉपर्टी सगळं आहे पण मनःशांती नाही, मेडिटेशन ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बंधू भगिनी व युवा उपस्थित आहेत. भविष्यात हे शिबीर तळेगांव पुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण मावळ परिसरासाठी आपण आयोजित करू असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रेमगंध ध्यान साधनेचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये श्वासावर आधारित साधना करून घेतल्या जातात. प्रेमगंध परिवाराचे संस्थापक प.पु.श्री.मनोजजी जैन (गुरुदेव) यांनी विकसित केलेल्या ९० हुन जास्त श्वासाच्या प्रकारातील काही प्रकारच्या साधना या शिबिरात स्वतः गुरुदेवांच्या उपस्थितीत माँ विदेही व टीम ने साधकांकडून करून घेतल्या. अनेक साधकांनी मनापासून साधना केली व खूप छान अनुभव घेतले. माँ विदेही यांनी या साधनांविषयी व प्रेमगंध विषयी तसेच प्रेमगंध तर्फे प्रकाशित केलेल्या अंकशास्त्र पुस्तक व ३ दिवसीय निवासी शिबिराबद्दल सविस्तर माहिती दिली.
साधने नंतर शेवटच्या टप्यात अनुभव सांगताना बऱ्याच साधकांनी खूप छान अनुभव मिळाल्याचे आवर्जून सांगितले. मेंदूला मुंग्या येणे म्हणजे काय ते अनुभवले, तसेच खूप शांत वाटतंय असे अनुभव सांगितले. प्रेमगंध मेडिटेशन तर्फे आयोजित होणाऱ्या ३ दिवसीय निवासी शिबिराला नक्की येणार असल्याचे सांगितले. या शिबिरासाठी किरणशेठ काकडे यांनी अन्नदान केले. रात्री सर्व उपस्थीत लोकांनी स्नेहभोजनाचा लाभ घेऊन शिबिराची सांगता झाली.