पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील शिवसेना-
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा लागू केला आहे. २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याचा शासन आदेश राज्य शासनाने काढला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना देखील अटी-शर्तीसह ५ दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे. आज (शनिवार) पासून महापालिकेच्या कार्यालयांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार सुट्टी असणार आहेत. कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढविण्यात आली आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा अशी पालिकेच्या कामाची वेळ राहणार आहे. वाहनचालकांच्या कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी पावणेआठ ते सायंकाळी साडेसहा अशी राहील. त्याचबरोबर कार्यालयीन वेळेमध्ये ४ जून २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार दुपारी दीड ते दोन या वेळेत अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भुत असणार आहे.
यापूर्वी ज्या कार्यालयांना, कर्मचाऱ्यांना दुसरा व चौथ्या शनिवारी सुट्टी लागू होती. त्याच कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू राहील. माहिती तंत्रज्ञान विभागाने थम्ब बायोमॅट्रिक संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करावेत. या आदेशाची अंमलबजावणी सर्व शाखाधिकाऱ्यांनी त्वरित करावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहे.
शाळा तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालये, पाणीपुरवठा, अग्निशामक दल, सफाई कामगार आदींना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही. त्यांची कार्यालयीन वेळ पूर्वीप्रमाणेच राहील, असे या आदेशात स्पष्ट केले आहे.






















Join Our Whatsapp Group