पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून शहरात “डॉक्टर आपल्या दारी” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापौर माई ढोरे यांच्या हस्ते शनिवारी (दि. ४) या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. कोरोना साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन वैद्यकीय तपासणीची सेवा देण्यात येणार आहे. नागरिकांनी सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून दारापर्यंत येणाऱ्या डॉक्टरांकडून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
महापालिकेच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामात शहरातील विविध सामाजिक संघटना स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स यांच्या वतीने शहरातील दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात जाऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी महापालिकेला ५ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन देण्यात आले आहेत. या व्हॅनमध्ये महापालिकेचे वैद्यकीय पथक सहभागी असणार आहे. या पथकाकडून शहरातील ६० वर्ष वयापुढील नागरिक आणि भिक्षेकरी यांची मोफत तपासणी केली जाणार आहे.
महापौर माई ढोरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाला शनिवारपासून (दि. ४) सुरू करण्यात आली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, अण्णा बोदडे, आपत्ती व्यवस्थापन मुख्य समन्वयक ओमप्रकाश बहीवाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सदस्य अविनाश ढमाले, सुप्रिया सुरगुडे, गोरख भालेकर, धनाजी नखाते, सुरेश गारगोटे, नवनाथ शिंदे, मिलिंद काटे, योगेश रसाळ, धनेश्वर थोरवे, अमित जाधव, मंगेश कोंढाळकर, भारतीयजैन संघटनेचे शहराध्यक्ष वीरेश छाजेड, सदस्य शुभम कटारिया, संदेश गादिया, सुभाष ललवाणी, अशोक पवार आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, “सध्या लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. परिणामी छोट्या आजारांच्या तपासणीसाठी रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी या मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत नागरिकांच्या दारापर्यंत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. ज्या परिसरामध्ये ही व्हॅन उभी करण्यात येईल तेथे ध्वनी क्षेपकाद्वारे रुग्णांना तपासणीकामी येण्याबाबत विनंती केली जाईल. डॉक्टर कोण्याच्याही घरी न जाता व्हॅनमध्येच संबंधिताची आरोग्य तपासणी करतील. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांनी मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधणे सक्तीचे असेल. सर्दी, खोकला, नाक गळणे, अंगदुखी ही लक्षणे अनेक प्रकारच्या विषाणूजन्य तापामध्येसुद्धा दिसून येतात. यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. वैद्यकीय तपासणी केल्यामुळे एखाद्या रुग्णामध्ये कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास संबधितास त्वरित वेगळे करून पुढील वैद्यकीय चाचण्या केल्या जातील. महापालिकेमार्फत सुरू केलेल्या या आरोग्य सेवेचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले आहे.”






















Join Our Whatsapp Group