पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन वाढवलायं. सर्वत्र उद्योग-धंदे, व्यवसाय बंद आहेत. कलाकारांचे व्यवसायही याला अपवाद ठरले नाहीत. शहरातील कलाकार, नृत्य कलाकार, गायन कलाकार, वादक यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर प्रकाश योजनाकार, ध्वनी योजना कार, मेकअप आर्टिस्ट पडद्यामागील कलाकार यांच्यावर देखील संकटाचा डोंगर कोसळला आहे. तरी पिंपरी चिंचवड शहरातील अशा कलाकारांना महापालिकेने मदतीचा हात द्यावा. आर्थिक तसेच इतर पध्दतीने मदत करावी अशी मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे केली आहे.
अमित गोरखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांस्कृतिक धोरणांतर्गत अनेक संस्कृतिक उपक्रम राबविले गेले आहेत. हे उपक्रम राबवताना पिंपरी चिंचवडमधल्या स्थानिक कलाकारांना महापालिकेने वेळोवेळी संधी दिलेली आहे. परंतु कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या सर्व कलाकारांना पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने मदतीचे धोरण अवलंबून त्यांना मदत करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात नृत्य कलाकार, गायन कलाकार, वादक यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. कार्यक्रम, रेकॉर्डिंग, शिकवणी असे सर्व स्त्रोत बंद झाल्याने शास्त्रीय नृत्य सादर करणारे साथ-संगत करणारे सहकलाकार यांचे उत्पन्न थांबले आहे. केवळ कलेवरील उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांकडे सहा ते आठ महिने आगामी कसे काढायचे हा प्रश्न आहे. कार्यक्रमास लागणारे प्रकाश योजनाकार, ध्वनी योजना कार, मेकअप आर्टिस्ट पडद्यामागील कलाकार आधी सर्वच अडचणीत आहेत. तरी पिंपरी चिंचवड मनपाने कला-क्रीडा संस्कृतीक धोरणा अंतर्गत आपली जबाबदारी म्हणून या सर्व कलाकारांना आर्थिक अथवा इतर पद्धतीने मदत करावी अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.