वडगाव मावळ (Pclive7.com):- पंचायत समिती सभागृहामध्ये आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रलंबित कामे, समस्या, स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी आवश्यक विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, पंचायत समिती सभापती निकिताताई घोटकुले, पंचायत समिती सदस्य गुलाब म्हाळसकर, शांताराम कदम, सर्व विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.
तालुक्यातील खडकाळा, कुसगाव खु., ताजे, पाटण, मळवली, कार्ला, वेहेरगाव, कुसगाव बु., कुरवंडे, नाणे, कांब्रे, करंजगाव, गोवित्री, उकसान, शिरदे, खांडशी या ग्रुप ग्रामपंचायतील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासोबत यावेळी आमदार शेळके यांनी संवाद साधला.
मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये विकासाला महत्त्व देत गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गावातील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा तसेच गावात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लागावे यासाठी गावातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखवत आपल्याला निवडून दिलेले आहे. जनमताचा आदर करत प्रत्येकाने गावातील समस्या सोडवण्यात सर्वतोपरी प्रयत्न करावे व यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही असे आमदार शेळके यांनी सांगितले.
शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजना गावपातळीवर तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे असून यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न करावे. गावातील निराधारांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी योजनेचा लाभ मिळवून द्यावा. आगामी काळात प्रत्येक गावात प्रत्यक्ष भेटी देऊन कामांची पाहणी करणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.