पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तंज्ञाकडून आता लहान मुलांना घातक ठरणारी तिसरी लाट येणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये लहान बालकांसाठी स्वतंत्र कोविड रूग्णालयाची निर्मिती करावी. तसेच तिथे बालरोग तज्ञांची व्यवस्था करावी अशा मागणीचे निवेदन ह प्रभागाचे स्विकृत नगरसदस्य अनिकेत काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिले आहे.
अनिकेत काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना (कोविड-19) या महामारीच्या दुस-या लाटेत संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादूर्भावामुळे शहरातील रूग्णांचे वाढते प्रमाण, सत्यस्थितीत लसीकरण केंद्राची संख्या कमी व अपुरा साठा त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नाही.
पिंपरी चिंचवड शहरातील वाढता मृत्यूदर लक्षात घेता तसेच केंद्रीय आरोग्य तज्ञांच्या मतानुसार, भविष्यात कोरोनाची येणारी तिसरी लाट भयंकर असून यावेळी लहान बालकांना या लाटेचा जास्त संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान बालकांना कोरोना या रोगाचा संसर्ग झाल्यास त्यांच्या उपचाराची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आतापर्यंत मोठ्या, प्रौढ व्यक्तींसाठी रूग्णालय उपलब्ध आहेत. परंतु पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत लहान बालकांकरीता स्वतंत्र कोरोना (कोविड-19) रूग्णालय नाही. त्यामुळे लहान मुलांसाठी रुग्णालयाची निर्मिती करून तेथे बालरोग तज्ञांची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. त्याबाबत योग्य ते नियोजन लवकरात लवकर करावे अशा मागणीचे निवेदन अनिकेत काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिले आहे.