पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन घोषित केलायं. मात्र तरी देखील शहरात या नियमांचे उल्लंघन नागरिकांकडून सर्रासपणे होत आहे. म्हणूनच निगडी पोलिसांनी कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६२ जणांवर पोलिसांची कारवाई केली आहे. या कारवाईत एका दिवसांत १ लाख ६१ हजार २०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.१० रोजी निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता निगडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी विशेष मोहिमोचे आयोजन केले होते. यात दिवसभरामध्ये रावेत ब्रीज कॉर्नर व त्रिवेणीनगर येथे नाकाबंदी लावुन लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत वेगवेगळी पथके तयार करुन ठिकठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या ७२ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ४८ हजार १०० रुपये दंड केला. तसेच मास्कचे परिधान न करणाऱ्या १२९ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ६४ हजार ५०० रुपये दंड तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणाऱ्या ३७ इसमांवर कारवाई करुन त्यांच्याकडुन १९ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
तसेच २० वाहनांवर कारवाई करुन ७ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे शासकीय आदेशाचे पालन न करता आस्थापना चालु ठेवणाऱ्या ४ आस्थापनांवर कारवाई करून २२ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला असून दिवसभरामध्ये एकुण २६२ इसमांवर कारवाई करुन त्यांच्याकडुन १ लाख ६१ हजार २०० रुपये इतका दंड वसुल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमडंळ १ मंचक इप्पर, सहा.पोलीस आयुक्त पिंपरी विभाग डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णदेव खराडे, सहा.पोलीस निरीक्षक, लक्ष्मण सोनवणे, अन्सार शेख, विरेद्र चव्हाण, विजयकुमार धुमाळ पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, ताकतोडे व निगडी पोलीस ठाण्याकडील पेट्रोलिंग पथकाचे पोलीस हवालदार ढोले व त्यांच्या पथकाने केली आहे.























Join Our Whatsapp Group