पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षी श्रावणामध्ये होणारी मंगलमूर्तींची द्वार यात्रा यंदाही कोरोनाच्या संकटामुळे होणार नाही. अद्यापही कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणारी द्वार यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2021/08/Screenshot_20210806-140745_Gallery-1024x558.jpg)
चिंचवड देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार तसेच सालाबादप्रमाणे श्रावणामध्ये होणारी द्वार यात्रा यावर्षी 9 ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये संपन्न होणार होती. परंतु, अजूनही कोरोनाचे वाढते प्रमाण भरपूर आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील नियमांमध्ये शिथिलता दिलेली नाही.
त्यामुळे शासनाच्या नियमानुसार असलेल्या जमावबंदी तसेच असलेल्या इतर निर्बंधांमुळे यावर्षी ही द्वार यात्रा होणार नाही. द्वार यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.