पिंपरी (Pclive7.com):- देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतामध्ये आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी अग्रगण्य संस्था इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांनी पुणे-शिवनेरी-पुणे असे २४० किलोमीटर सायकल प्रवास करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. यामध्ये १७५ सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता.
या सर्व १७५ सायकलस्वारांना पहाटे पाच वाजता निगडी भक्ती शक्ती येथून झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सीए कृष्णलाल बंसल, उद्योजक अण्णारे बिरादार, आयएमएचे डॉ.सुहास माटे, रेल्वे अधिकारी ऋषिकेश पोटे, आयएएसचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्या हस्ते या मोहिमेची झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली.
सर्व सायकल स्वार १२० किलोमीटर अंतर पार करून ६ तासांमध्ये शिवनेरी येथे पोहोचले. वाटेमध्ये राजगुरुनगरचा घाट आणि नारायणगावचा चढ सर्व सायकल स्वारांनी लीलया पार केले. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू सायकलिंग असोसिएशन तर्फे सर्वांना नाष्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एचआरएसएचे प्रतिनिधी निलेश काळे, सुनील धुमाळ सर व रवी चंदन यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
पुणे, पिंपरी-चिंचवड अशा विविध ठिकाणाहून सायकल राईड मध्ये भाग घेतला. शिवनेरी येथील साई संस्थानचे धनंजय माताडे, शिवनेरी ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रशांत गुंजाळ, सुनील इचके, ओझर अष्टविनायक संस्थांचे प्रमुख विश्वस्त गणेश कवडे यांनी सर्व सायकल स्वरांचे उत्साहाने स्वागत केले. शिवनेरी येथील सर्व व्यवस्थापन पाहिले असे इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.
“सायकल चलाओ करोना हटाओ”, “पोलूशन पोलूशन, सायकल इज द सोल्युशन” अशा घोषणा पुणे सायकल प्रतिष्ठानचे बाळ भिंगारकर यांनी दिल्या. कोरोना सारख्या रोगांवर एकमेव उपाय म्हणजे सायकल आहे असे सीए कृष्णलाल बंसल यांनी सांगितले. शिवनेरीच्या पायथ्याला इतिहासाचे अभ्यासक यश मस्करे यांनी जुन्नर भागातील ऐतिहासिक लेण्यांची माहिती व पर्यटन विषयी मार्गदर्शन केले.
शिवनेरी रायगड नियोजनामध्ये इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे रमेश माने, श्रीकांत चौधरी ,गिरीरा उमरीकर, अमित पवार, नागेश सलियन, अजित गोरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.



























Join Our Whatsapp Group