पिंपरी (Pclive7.com):- काल पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या तीन कर्मचार्यांसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी पालिकेत छापा घातला. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्षाच्या स्वीय सहायकाच्या केबिनमध्ये ८ लाखांहून अधिक बेकायदा रक्कम आढळून आली आहे.
या कारवाईनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने अध्यक्ष लांडगे आणि स्वीय सहायक यांच्या घरावर छापे घातले असून ही झडतीची कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती. याप्रकरणी स्थायी समितीचे चेअरमन नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना शनिवारी (दि.२१) सकाळपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. लांडगे यांना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत.
स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लिपिक व स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भिमराव कांबळे अशा पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली होती.
त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होत त्यावेळी नितीन लांडगे यांना शनिवारी सकाळपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
या सगळ्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ माजली असून यामुळे राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरलं आहे. आणखी दिग्गज नगरसेवकांची नावे पुढे येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.