पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी न्यायालयास अंतरिम जामीन मिळण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जामीन मिळण्यासाठी केलेले लांडगे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अंतरिम जामीन ना मंजूर झाल्याने लांडगे यांची न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
नितीन लांडगे यांनी आज्जीचे (आईची आई) निधन झाल्याने तिच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमास जायचे आहे, असे कारण सांगून लांडगे यांनी अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करीत २६ ऑगस्टपर्यंत जामीन देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात लांडगे यांच्या आज्जी नाही तर वडिलांच्या मावशीचे निधन झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायायलात दिली. त्यामुळे लांडगे यांचा जामीन फेटाळून लावण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केला.
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. लांडगे यांनी यापूर्वी नियमित जामीनासाठी अर्ज केला आहे. इतर आरोपींनी देखील मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जांवर शुक्रवारी ( तारीख २७) सुनावणी होणार आहे.
तक्रारदार हे जाहिरात ठेकेदार आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेडील २६ वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी निविदा भरल्या होत्या. २०१९ व २०२० च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क ऑर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे याच्याशी संपर्क केला. त्याने बोली रकमेच्या तीन टक्के रक्कमेनुसार १० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सहा लाख रुपयांचे देण्याचे ठरले. त्यातील १ लाख १८ हजार रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. १ लाख १८ हजार रुपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटककारवाई केली आणि पाच जणांना अटक केली.
अॅन्टी करप्शनचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेंदळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group