पिंपरी (Pclive7.com):- नेहमी वाजतगाजत, विविध उपक्रमांच्या आयोजनातून आणि लाखोंच्या उलाढालींमुळे चर्चेत येणारी उद्योगनगरीतील दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी करोनामुळे शांततेत पार पडली. करोना संसर्गाचा धोका कायम असल्याने, गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहरातील आयोजकांनी यंदा नियम पालनाचा मार्ग स्वीकारला.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या १५ वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात दहीहंडी साजरी करण्यात येते. भोसरी, चिंचवड, प्राधिकरण, सांगवी, दापोडी, वाकड आदी भाागांत प्रामुख्याने आयोजित होणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमांचे सर्वपक्षीय आयोजक आहेत.
राजू मिसाळ, अनुप मोरे, राजेश फलके, राहुल कलाटे, सचिन चिखले, रोहित काटे, हर्षल ढोरे, मोरेश्वर शेडगे, जालिंदर शिंदे, कैलास कुटे, संदीप कस्पटे, तुषार सहाणे, योगेश लांडगे आदी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांचा आयोजकांमध्ये समावेश आहे.
किमान पाच ते २५ लाखांपर्यंत खर्च होणाऱ्या दहीहंडीसाठी मालिका व चित्रपटांमधील नायक-नायिका हेच मुख्य आकर्षण ठरले आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचे मानधन देण्यास आयोजक जराही मागेपुढे पाहत नाहीत. जवळपास २० ते २५ हजारांची गर्दी झाल्याचे चित्र अनेक दहीहंडय़ांमध्ये दिसून आले आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, कोकण, पुणे, इंदापूर आदी भागांतील गोविंदा पथके शहरात येतात. करोनामुळे गेल्या दोन वर्षांत सर्वाच्याच उत्साहावर पाणी पडले आहे. करोनामुळे आणखी संसर्ग होऊ नये, अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे. त्यामुळे यंदा काही मंडळांनी प्रतिकात्मक दहीहंडी साजरी केली तर काहींनी दहीहंडीचा निधी विधायक कामांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.