पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘ती’चा गणपती महोत्सवांतर्गत ‘मूर्तीदान’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पर्यावरण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात प्रदूषण रोखण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने शाडु माती व तुरटीपासुन तयार केलेल्या गणेश मूर्तीचे भाविकांना नुकतेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमाचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, पी.के. इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन जगन्नाथ काटे, फाऊंडेशन अध्यक्षा कुंदाताई भिसे ,राजेंद्रनाथ जयस्वाल, राजु देवतारे, आर.के. पाटील, रमेश वाणी, जगन्नाथ वाळके आदींसह जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य,महिला वर्ग व इतर नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले कि, उन्नती सोशल फाउंडेशनचा हा उपक्रम खूपच समाजपयोगी व आपल्या पर्यावरणाचीपूरक आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत मूर्तीची कोणतीही किंमत न ठेवता नागरिकांकडून स्वच्छेने दानपेटीत रक्कम गुप्तदान करण्यात येते. हा उपक्रम शहरातीलच नव्हे तर राज्यातील प्रत्येक गावागावात झाला तर आपला परिसर नक्कीच प्रदूषण मुक्त होईल. व उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवते असे म्हणत फाऊंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी आमदार जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या या गणेश मुर्त्यांची किंमत न ठेवता ‘ऐच्छिक दान’ पद्धत राबवली आहे. या मूर्ती घेऊन जाताना भाविकांनी स्वच्छेने ऐच्छिक काही रक्कम दिली आहे.भाविकांनी दान केलेली ही रक्कम वेलफेअर ट्रस्ट, पुणे यांना सुपुर्त करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी सांगितले.