पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (क्रमांक दोन) जितेंद्र वाघ यांची तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात आली. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (जमीन) पदावर वाघ कार्यरत होते. त्यांच्या अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्तीबाबतचा आदेश राज्य सरकारचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी काढला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे मंजूर आहेत. एक आणि दोन क्रमांकाचे पद राज्य सरकारच्या सेवेतून आणि तीन क्रमांकाच पद महापालिका सेवेतून भरले जाते. सध्या एक क्रमांकाच्या पदावर अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि तीन क्रमांकाच्या पदावर अतिरिक्त आयुक्त व नगरसचिव उल्हास जगताप कार्यरत आहेत.
तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार (क्रमांक दोन) यांना सात एप्रिल रोजी महापालिका सेवेतून कार्यमुक्त केले होते. तेव्हापासून अर्थात गेल्या सहा महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्त क्रमांक दोनचे पद रिक्त होते. त्यावर आता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश सप्टेंबर २०१४ पासून ‘ब’ वर्ग महापालिकांमध्ये झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार करण्यात आले. त्या आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या दोन क्रमांकाच्या पदावर अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत.
राज्याच्या महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गातील पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक जितेंद्र वाघ यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक केली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे. ‘‘नगरविकास विभागाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुजू होणार आहे,’’ असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.























Join Our Whatsapp Group