पिंपरी (Pclive7.com):- सामान्य जनतेला शासकीय योजनांची तसेच पोस्टात विविध योजनेत गुंतवणूक कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पोस्ट आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दोन दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पोस्टात गुंतवणूक कशी करावी, त्याचे फायदे काय यासाठी पोस्ट विभाग आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शासकीय योजना व आधार कार्ड मेळाव्याचा फुले नगर, लांडेवाडी प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांनी लाभ घेतला अशी माहिती माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी पोस्ट विभागाचे जनसंपर्क अधिकारी मोहन बांडे, पोस्टमास्तर सीमा टावरे, पोस्टमन उषा भिडे, पोस्टमन दामोदर घोलप तसेच उमाकांत पवार, मदत कार्य हक्क दर्शक संदीप कांबळे तसेच जितेंद्र ननावरे मित्र परिवार व कार्येकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात नागरिकांची गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी, योग्य परतावा मिळावा, यासाठी पोस्टाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंञी सुरक्षा विमा योजना, प्रधानमंञी जीवन ज्योति विमा योजना, भविष्य निर्वाह निधी, अटल पेंशन योजना, मातृवंदन योजना, इंडिया पोस्ट पेंमेंट बॅंक, ई-श्रम कार्ड अशा विविध पोस्टाच्या योजनांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच गरजूंना नविन आधार कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती करुन देण्यात आली.
मुलांना शालेय प्रवेशावेळी आधार कार्ड सादर करावे लागते. त्यासाठी पालक व पाल्य यांना आधार केंद्रावर चकरा माराव्या लागतात. या शिबीरात गरजूंना सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. विमा धारक व्यक्तीचा मृत्यु झाल्यास प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अटल पेंशन योजनेची, लहान मोठे पेमेंट साठी इंडिया पोस्ट पेंमेंट बॅंकेतुन करता येतील, मातृवंदन योजनेअंतर्गत गरोदर स्ञीयांनी नाव नोंदणी केल्यास देण्यात येणारी रक्कम, भविष्य निर्वाह निधी मार्फत पोस्टात खाते उघडणे याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
फुले नगर, लांडेवाडी प्रभाग क्रमांक 20 मधील पाचशेहून जास्त नागरिकांना आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती करुन देण्यात आली. या मेळाव्याच्या आयोजनात भारतीय डाक विभागाचे कर्मचारी, जितेंद्र ननावरे मित्र परिवार व हक्कदर्शक संस्थेच्या पदाधिका-यांनी सहभाग घेतला.