पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणुकीत त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार असल्याचे निश्चित झाल्याने संदिग्धता संपली आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यास वेग दिला आहे. ढोबळ मनाने आरक्षणाचा विचार करता ३ सदस्यांचे ४२ प्रभाग तर दोन सदस्यांचा १ प्रभाग होणार आहे. ४३ प्रभागांपैकी २३ प्रभागात दोन महिला तर एक पुरुष उमेदवार अशी विभागणी असणार आहे.
महापालिकेतील नगरसेवकांचे एकूण १२८ संख्याबळ आहे. एकूण नगरसेवकांपैकी ६२ पुरुष तर ६६ महिला नगरसेविका असणार आहेत. दरम्यान, चार महिला नगरसेविकांची संख्या जास्त राहणार आहे, त्यामुळे त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीचा महिलांना फायदा होणार आहे.
राज्य सरकारने सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करत मुंबई वगळता १७ महापालिकांच्या निवडणुका तीन सदस्यीय पॅनल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत तीन नगरसेवकांचा एक प्रभाग पद्धतीनेच निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्याबाबतचा स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे देखील पाठविण्यात आला आहे.
एकूणच प्रभाग रचनेची संदिग्धता संपली असून निवडणूक विभागाने कामाला गती दिली. तळवडे गावठाणापासून नव्याने प्रभाग तयार होईल सांगवीत प्रभाग रचनेचा शेवट होईल. सांगवीतील शेवटचा प्रभाग २ सदस्यांचा राहू शकतो.
२५ सदस्यांची समिती प्रभाग रचनेचे काम करत आहे. गुगलमॅपद्वारे सीमांकण केले जात आहे. निवडणूक २०११ च्या जनगणेनुसार होणार आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे. शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यापैकी १३ लाख ५० हजार मतदार आहेत. मतदारनोंदणी सुरु असून १४ लाखापर्यंत मतदारसंख्या होऊ शकते. नगरसेवकांची संख्या १२८ च राहणार आहे. एकूण ३१०२ ब्लॉक आहेत. एका ब्लॉकमध्ये ४०० ते ८०० लोकसंख्या राहणार असून १५० घरांची मर्यादा आहे.
३६ ते ४४ हजार दरम्यान लोकसंख्येचा एक प्रभाग होईल. एका प्रभागात सुमारे ४० हजार लोकसंख्या राहील. १२८ नगरसेवकसंख्येपैकी अनुसूचित जाती (एससी) साठी २० जागा राखीव राहणार असून त्यात १० महिला, १० पुरुष असणार आहे. त्याचे प्रमाण १५.५० टक्के आहे.