पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.२८, रहाटणी-पिंपळे सौदागर कोकणे चौक येथील लिनियर गार्डनमधील समस्यांमुळे शेजारीच असलेल्या रुणाल्स दिपमाला सोसायटीमधील नागरिक प्रचंड त्रस्त ़आहेत. माजी विरोधी पक्षनेते तथा स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी सोसायटतील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच लवकरच या सर्व समस्यांवर मार्ग काढला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन हे नागरिकांसाठी एक वरदान ठरत आहे. पण काही नागरिकांच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे शेजारच्या सोसायटीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने लिनियर गार्डनच्या संदर्भात ओपन जिमसाठी नागरिक पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत येथे येत असतात. यावेळी ते मोठ्याने एकमेकांना ओरडतात आणि मोठ्या आवाजात संगीत लावतात.
इथेच पब्लिक स्क्वेअर प्लाझा आहे. याठिकाणी, मोठ्याने संगीत वाजवणे, ग्रुपने डान्स करणे, मध्यरात्री पार्ट्या केल्या जातात. या लोकांच्या गोंधळामुळे सोसायटीतील रहिवाशांना त्रास होत आहे. तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे लोक दारू पिऊन धिंगाणा घालत असतात अशा समस्या नागरिकांनी मांडल्या.
या सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन नगरसेवक नाना काटे यांनी सोसायटीतील नागरिकांना दिले. यावेळी सोसायटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी तसेच रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group