पिंपरी (Pclive7.com):- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी तसेच निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक झाली. त्यात गटतट विसरून पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी वज्रमूठ बांधल्याचे दिसले.
आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड स्टेशन येथील जनसंपर्क कार्यालयात बुधवारी (दि. २७) झालेल्या बैठकीस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका स्वाती काटे, नगरसेवक रोहित काटे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, संदीप चिंचवडे आदी उपस्थित होते.
महापालिकेची निवडणूक साडेतीन महिन्यांवर आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील स्थानिक नेत्यांना एकजुटीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार निवडणूक मोर्चेबांधणी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने रणनिती ठरविण्यासाठी तसेच, विशेषतः पिंपरी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य प्रभागरचना, त्यांचा सीमा, इच्छुक उमेदवार तयारी, त्या-त्या प्रभागातील मतदार वर्ग आदी विषयावर चर्चा केली.
भाजपच्या सत्ताकाळात वाढलेला भ्रष्टाचार, विकास कामांतील ढिसाळपणा आणि शहराचे विद्रुपीकरण आदी विषयांवर भाजपला घेरण्याची रणनिती बैठकीत आखण्यात आली. तसेच, निवडणुकीसंदर्भातील प्रायोगिक बैठक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group