पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात घरोघरी, दुकानात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजन व नरकचतुर्दशी एकत्र आल्याने पहाटेपासूनच उत्साही वातावरण होते. व्यापाऱ्यांनी दुकानांच्या व्यवहारासाठी असलेल्या नव्या हिशेब वही खात्यांचे (चोपड्यांचे) पूजन केले. घरोघरी लक्ष्मीपूजनाचा सोहळा मंगलमय व उत्साही वातावरणात पार पडला.

घरातील लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. लक्ष्मीपूजनात केरसुणी पूजेला महत्त्व आहे. त्यासाठी नवीन आणलेली केरसुणी पूजेसाठी ठेवण्यात आली. मंगलकलश, लक्ष्मीची प्रतिमा व त्यापुढे केरसुणी ठेवण्यात आलेली होती.
झेंडूच्या फुलांच्या माळा व आकर्षक रोषणाईमुळे परिसरात मंगलमय वातावरण तयार झाले होते. व्यापाऱ्यांनी मुहूर्तावर सरस्वती, लक्ष्मीपूजन, कुबरेची पूजा केली. पूजेच्या वेळी दाग-दागिने ठेवण्यात येतात. यासह लाह्या, बत्तासे, चने, गूळ, करंजी, लाडूचा प्रसादवाटप करण्यात आला.
बाजारात दिवसभर लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झेंडूची फुले, केरसुणी, तसेच नैवेद्यासाठी मिठाई, लाह्या बत्तासे, बोळके, ऊस, पूजेसाठी लागणारे वेगवेगळे वाण खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
दुकानासमोर व घरांना झेंडूच्या फुलांची तोरणे बांधण्यात आली होती. त्यासोबतच आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
फुलांच्या तोरणमाळा, सप्तरंगी रांगोळ्या, दिव्यांच्या झगमगायत लक्ष्मीपूजन करण्यात आले. पूजेनंतर शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group