पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारी महात्मा जोतिराव फुले स्मारकात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहेत. तसेच फुले सृष्टी उभारण्यात येत आहे. त्या कामाचे भूमिपूजन छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवार (दि. २३) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा अस्तित्वात नाही. स्त्री शिक्षणाची जननी म्हणून सावित्रीबाईचे कार्य अनमोल आहे. सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा विशेषतः महिला वर्गास प्रेरणादायी ठरेल. शहराच्या नावलौकिकातही भर पडणार आहे.
पुतळ्याचा बाजूस जिना व लिफ्ट असणार आहे. पुतळ्यावर आरसीसीमध्ये घुमट असणार आहे. पुतळ्यासमोर ३५० लोकांकरिता ओपन एअर थिएटर, स्टेजच्या मागे एलईडी स्क्रीन, कलाकारांसाठी विश्रांती कक्ष, बगीचामध्ये कांस्य धातूचे उठाव शिल्प, भिंतीकरीता बांधकाम, जीआरसी कामामध्ये वाडा संकल्पना पुर्ण परिसराकरीता पेन्सिल संकल्पनेतील सिमाभित, स्वच्छतागृह आदी स्मारकात निर्माण करून सुशोभीकरण केले जाणार आहे.
महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. परिसरात फुले सृष्टी अंतर्गत त्यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक कांस्य धातूतील १२ फूट बाय ८ फूट आकाराचे एकूण २० म्युरल बसविण्यात येणार आहेत पुतळ्याच्या दोन्हीही बाजूस बिहीर कारंजे, दर्शनी बाजूस ज्ञानज्योती फुल झाडांचा वाफा तसेच, परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.