पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी या प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्स्याची १० टक्के भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ या दरम्यान लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरता येणार आहे.
या प्रकल्पामध्ये ज्या लाभार्थ्यांची नावे विजेता यादीमध्ये आहेत. ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा लाभार्थ्यांनी आपला १०% स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात १५ डिसेंबर २०२१ पासून येऊन चलनाद्वारे आपली स्वहिस्सा रक्कम भरावी असे आवाहन महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
या योजनेत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी एकूण ३६६४ सदनिका बांधण्यात येते आहे. त्यापैकी बोऱ्हाडेवाडी येथे १२८८ व चऱ्होली येथे १४४२ असे सदनिका वाटप करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पुर्ण झालेली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खालील संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
https://www.pcmcindia.gov.in/marathi/pmay_iresult.php
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. याबाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग २०५ व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव पुणे-३३ या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे.























Join Our Whatsapp Group