शहरात लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे दिले आश्वासन
पिंपरी (Pclive7.com):- आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमधील मनसेच्या पदाधिका-यांची आज मुंबईत बैठक घेतली. आगामी पालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला रोखण्यासाठी महत्वाच्या मुद्यांवर काम करायला सुरूवात करा. कोणत्याही परिस्थितीत जास्तीजास्त जागा निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिका-यांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची ताकद वाढविण्यावर पदाधिकारी आणि ठाकरे यांच्यात बराचवेळ चर्चा झाली. यावेळी मनसे नेते अनिलजी शिदोरे, किशोर शिंदे, बाबू वागस्कर, उपाअध्यक्ष रणजित शिरोळे, गणेश सातपुते उपाअध्यक्ष, शहरप्रमुख सचिन चिखले, विशाल मानकरी, राजू सावळे, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, अंकुश तापकीर, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी घेतल्या जाऊ शकतात. या निवडणुका पुढे ढकलल्या जातील यावर विश्वास ठेवून गाफील बसू नका. या निवडणुकीत आपल्याला जास्तीजास्त जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी लोकांमध्ये राहून लोकांची कामे करण्यावर भर द्या. सर्वांना विश्वासात घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवा. असे ठाकरे यांनी पदाधिका-यांना सांगितल्याची माहिती चिखले यांनी दिली.
तसेच, पिंपरी-चिंचवड शहर मनसेचे कार्यालय लवकरच सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन आपल्या हस्ते करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन कार्यालयाच्या उद्घाटनासह कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासही सम्मती दर्शविली. कार्यालयाची संपूर्ण तयारी झाल्याबाबत त्यांनी विचारणा देखील केली. लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी पदाधिका-यांना सांगितल्याचे चिखले यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group