पिंपरी (Pclive7.com):- हॉकी इंडियाच्या ११व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हॉकी पंजाबने विजेतेपद मिळविले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशाचा शूट आऊट मध्ये २-१ असा पराभव केला. विजेत्या संघास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.

हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ च्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्राम स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, शहर सुधारणा समिती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती माधवी राजापुरे, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, माजी ऑलिम्पियन हॉकी खेळाडु विक्रम पिल्ले, नगरसदस्या अपर्णा डोके, सुजाता पालांडे, अश्विनी जाधव, शारदा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, हॉकी इंडियाचे सहसचिव फिरोज अन्सारी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनिष आनंद, सरचिटणीस मनोज भोरे, सहशहर अभियंता सतिश इंगळे, संदेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे आदी उपस्थित होते.
अंतिम सामन्यात हाॅकी पंजाबने हाॅकी उत्तरप्रदेशवर शूटआऊटमध्ये २-१ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. तर उपविजेता ठरलेला हाॅकी उत्तरप्रदेश संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. तिस-या स्थानासाठी कर्नाटक विरुध्द महाराष्ट्र यांच्यात लढत झाली, यामध्ये कर्नाटकने महाराष्ट्राचा ३ गोलाच्या फरकाने पराभव करत कांस्य पदक पटकावले.
नियोजित वेळेत दोन्ही संघ गोलशून्यची बरोबरी तोडू शकले नाहीत. त्यानंतर घेण्यात आलेल्या शूट आऊटमध्ये पंजाबने बाजी मारली. पंजाबकडून विशाय यादव, मेहकीत सिंग, तर उत्तर प्रदेशकडून केवळ महंमद अमीर खान यालाच गोल करण्यात यश आले. पंजाकडून रणजोत सिंग, सिंग हरताज औजला यांना गोलरक्षकाला चकवण्यात अपयश आले. उत्तर प्रदेशाकडून अजय यादव, महंमद सादिक, महंमद सैफ खान आणि तरुण अधिकारी हे खेळाडू आपल्या संधी साधू शकले नाहीत.
त्यापूर्वी, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कर्नाटकाने यजमान महाराष्ट्राचा ५-२ असा पराभव केला. कर्नाटकाने सामन्याला आक्रमक सुरवात केली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला यतिश कुमार याने गोल करताना महाराष्ट्राचा गोलरक्षक आकाश चिकटेला चकवले. त्यानंतर दोन मिनिटांनी अशीच कामगिरी करत कर्णधार महंमद राहिलने गोल करून कर्नाटकाची आघाडी भक्कम केली. महाराष्ट्राचा कर्णधार तालेब शाह याने २४व्या मिनिटाला गोल करून महाराष्ट्राचे आव्हान कायम राखले होते. मध्यंतराला कर्नाटकाने २-१ अशी आघाडी राखली.
उत्तरार्धानंतर तालेबने आणखी एक गोल करून सामन्यात २-२ अशी बरोबरी राखली. उत्तरार्धाची सुरवात महाराष्ट्रासाठी आश्वासक झाली असली, तरी त्यानंतर सामन्यावर कर्नाटकाचे पूर्ण वर्चस्व राखले. बरोबरीनंतर सामन्याच्या ३७व्या मिनिटाला पवन मदिवलार याने कर्नाटकाला पुन्हा आघाडीवर नेले. सोमण्णा एन. डी याने ४५व्या मिनिटाला आघाडी भक्कम केली आणि ५२व्या मिनिटाला लिखित बीएम याने गोल करून कर्नाटकाचा विजय साकार केला.
निकाल – हॉकी पंजाब ० (२) (शूट आऊटमध्ये विशाल यादव, मेहकीत सिंग) शूट आऊट उत्तर प्रदेश ० (१) (शूटआऊटमध्ये मोहंमद अमीर खान)हॉकी कर्नाटक ५ (यतिश कुमार ३रे, मोहंमद राहिल ५वे, पवन मदिवलार ३७वे, चिरंथ सोमण्णा एन.डी. ४५वे, लिखिथ बीएम ५२वे मिनिट) वि.वि. महाराष्ट्र २ (तालेब शाह २४वे, ३३वे मिनिट) मध्यंतर २-१





















Join Our Whatsapp Group