पिंपरी (Pclive7.com):- बोगस कागदपत्रे सादर करुन रस्ते-गटर सफाईच्या निविदेतून तब्बल ५५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत केला.
संबंधित ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद आणि तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन अनुभव कागदपत्रे आणि बोगस लेटरहेड सादर केले. महापालिका दक्षता समिती काय तपास करते? असा सवालही कामठे यांनी उपस्थित केला.
महापालिका सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.नगरसेवक कामठे म्हणाले की, अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते गटर सफाईच्या कामासाठी राजकीय हस्तक्षेप करुन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे सादर करुन या कामाचा ठेका मिळवण्याचा घाट घातला आहे. सभागृहातील एका ज्येष्ठ नगरसदस्याने याला हातभार लावला आहे.
भाजपाने भ्रष्टाचारमुक्त कारभार या मुद्यावर निवडणूक लढली आणि जिंकलीसुद्धा. ज्या-ज्या वेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी न डगमगता माझी भूमिका मांडली आहे. आता वर्षाच्या शेवटी समोर आणलेल्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा छडा महापालिका आयुक्तांनी लावावा. रस्ते सफाईच्या निविदेत अनियमितता असून, याबाबत सखोल चौकशी करावी.
येत्या आठ दिवसांत त्याचा अहवाल सादर करावा. अन्यथा नगरसेवकपदाचा त्याग करुन पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या कररुपी पैशावर डल्ला मारणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे, अशा इशाराही नगरसेवक तुषार कामठे यांनी दिला आहे.