पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड मोहननगर, पिंपरी उद्यमनगर परिसरामध्ये बेघरांसाठी (‘एचडीएच’) घरे या योजनेतील घरांचे प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. जेवढे लाभधारक आहेत. त्यापेक्षा जास्ते घरे असून शिल्लक घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षेतील नागरिकांना द्यावीत अशी सूचना शहर सुधारणा समितीच्या सभापती अनुराधा गोरखे यांनी महापालिका प्रशासनाला केली.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात सभापती गोरखे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने चिंचवड मोहननगर, पिंपरी उद्यमनगर परिसरामध्ये बेघरांसाठी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याठिकाणी जेवढे लाभधारक आहेत. त्यापेक्षा जास्त घरे निर्माण होत आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेत शहरातील असंख्य लाभधारकांनी घरासाठी अर्ज केले आहेत. अनेक लाभधारक प्रतिक्षेत यादीत आहेत. जर बेघरांसाठी घरे या योजनेतील उर्वरित घरे आवास योजनेमधील प्रतिक्षेत असलेल्या लाभधारकांना दिली. तर, याचा फायदा या गरीब व गरजु कुटुंबीयांना मिळेल. त्यानुसार पुढील कार्यवाही करावी अशी सूचना सभापती गोरखे यांनी आयुक्तांना केली.