पिंपरी (Pclive7.com):- एक महिला दुचाकीवरून जात असताना त्याची पर्स रस्त्यावर पडली. ती बाब समजल्यानंतर नगरसेविका अनुराधा गोफणे यांनी तत्काळ त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पर्स घेऊन गेलेल्या मुलाचा शोध घेऊन ती पर्स महिलेला परत करण्यात आली. पर्समध्ये ४९ हजार रुपये, महागडा मोबाइल, एटीएम कार्ड होते. पर्स आहे तशी माघारी मिळाल्याने त्या महिलेस अश्रू रोखता आले नाहीत. त्यानी नगरसेविका गोफणे यांचे आभार मानले.
ही घटना बुधवारी (दि.१९) दुपारी दोनच्या सुमारास भोसरीतील गवळीनगर परिसरात घडली. सानिया शेख या गुळवेनगर हाऊसिंग सोसायटीतून भोसरी आळंदी रस्त्यावरून दुचाकीवर चालल्या होत्या. त्यावेळी त्यांची पर्स रस्त्यावर पडली. पुढे गेल्यावर त्यांना पर्स पडल्याचे लक्षात आले. त्यांनी रडत रडत नगरसेविका गोफणे यांना संपर्क साधला. नगरसेविका गोफणे या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या. तेथील इमारतीवरील सीसीटीव्ही कॅमेन्याचे फुटेज त्यांनी तपासले. त्यात दोन मुले पर्स घेऊन जाताना दिसले.
फुटेजच्या आधारे आजुबाजुच्या परिसरात माग काढत शास्त्री चौक येथील मोकळ्या जागेत झोपड्यात ती मुले आढळून आली. नगरसेविकेने खडसावून विचारले असता त्यांनी पर्स गपचुप परत केली. त्या मुलास नगरसेविकेने ५०० रुपये बक्षीस दिले. गोफणे यांनी ती पर्स शेख यांच्याकडे स्वाधिन केली. पर्समधील ४९ हजार रुपयांची रोकड, मोबाईल व इतर कागदपत्रे आहे तसे असल्याने शेख या खुश झाल्या. त्यांना अश्रू लपविता आले नाहीत.