पिंपरी (Pclive7.com):- वेणूनगर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाले. यावेळी बोलताना वाकड परिसरात बुद्धिबळाच्या प्रसारासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे, गायकवाड यांनी जाहीर केले.
दरम्यान विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष मधुकर रहाटे यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विरंगुळा केंद्राच्या सदस्यांनी खूप सुंदर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला. विविध उपक्रम आयोजित करण्यात आघाडीवर असलेल्या या केंद्रातर्फे सर्वांसाठी बुद्धिबळाची एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे-तेली यांनी एकाच वेळी २६ खेळाडूंबरोबर सायमल पद्धतीने बुद्धिबळ खेळल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदीर्घ काळ चमकदार कामगिरी करणाऱ्या स्वाती घाटेंबरोबर प्रत्यक्ष बुद्धीबळ खेळण्याची संधी मिळाल्यामुळे सर्व खेळाडूंमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला. बुद्धीबळाला चालना देण्यासाठी असे उपक्रम भविष्यातही करत राहण्याचे मनोगत स्वाती घाटेंनी व्यक्त केला.
वाकड परिसरातील अनेक मान्यवर नागरिक, तसेच वाकड हौसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाप्रसंगी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमामध्ये आरबीटर म्हणून विनिता श्रोत्री ह्यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सातकर यांनी केले. कोव्हीड संबंधित सर्व काळजी घेऊन विरंगुळा केंद्रातर्फे सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.