पिंपरी (Pclive7.com):- शिवेसेनेचे नेते माजी खासदार गजानन धरमसी बाबर (वय-७९) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक मधुकर बाबर, प्रकाश बाबर हे त्यांचे धाकटे भाऊ होत. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांचे ते चुलते होते.

सलग तीन वेळा पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक, नंतर हवेली विधानसभेत शिवसेनेचे दोन वेळा आमदार आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम शिवेसना खासदार असा बार यांचा राजकीय प्रवास आहे. पिंपरी चिंचवड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष होते.
आयुष्याच्या अखेर पर्यंत व्यापारी संघटना, शहरातील हातगाडी, पथारी, टेंपो, रिक्षा संघटनांचे संघटन त्यांनी केले. शहरातील या घटकांसाठी त्यांनी सातत्याने आग्रही भूमिका मांडली. वाई येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना गेली १५ वर्षे बाबर हे या कारखान्याचे उपाध्यक्ष होते.
पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची काळभोरनगर येथे शाखा स्थापन करण्यापासून गेल्या ५० वर्षांतील त्यांचे मोठे योगदान आहे. नगरपालिका काळात नगरसेवक झाल्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे काम लोकांच्या लक्षात आहे.





















Join Our Whatsapp Group