पिंपरी (Pclive7.com):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. स्मार्ट सिटीची कमिटी आणि ठेकेदार मिलीभगत करुन काम करत आहेत. त्यामुळे शहरातील स्मार्ट सिटीच्या कामातील अनियमिततेची निपक्षपातीपणे चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तातडीने शहरविकास मंत्र्यांना नोंद घेण्याचे आदेश दिले.
संसदेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्मार्ट सिटी ही महत्वकांक्षी योजना आहे. देशाच्या 100 शहरात ही योजना राबविली जाते. माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. या कामासाठी केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकार 25 आणि महापालिका 25 टक्के निधी देत आहे.
शहरात स्मार्ट सिटीचे चालू असलेले काम टेक महिंद्रा, एल अॅण्ड टी, बी.जी.शिर्के आणि बेनेट कोलमेन या कंपन्या करत असल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. परंतु, प्रत्यक्षात या कंपन्या काम करत नाहीत. या कंपन्यांनी सब ठेकेदाराला काम दिले आहे. सब ठेकेदार व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे दर्जा राहत नाही. पूर्वीच विकसित असलेल्या भागात स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. स्मार्ट सिटीची कमिटी आणि ठेकेदार मिलीभगत करुन काम करत आहेत.
विकास कामे केवळ कागदावर दिसत आहे. प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात चाललेल्या स्मार्ट सिटीतील कामांची पूर्ण निपक्षपातीपणे चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शहरविकास मंत्र्यांना नोंद घेण्याचे आदेश दिले.



























Join Our Whatsapp Group