पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. १३ ते १७ फेब्रुवारी असे पाच दिवस रोजगार मेळावा, मोफत महाआरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिर, आदर्श व्यक्तीमत्वांचा सन्मान, शरीर सौष्ठव स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
याबाबतची माहिती देताना युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे म्हणाले, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य महारोजगार मेळावा होणार आहे. मेळाव्यातील सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यातून सुमारे दोन हजार युवक-युवतींना नोकरीची संधी मिळणार आहे. १८ ते ३० वर्षे या वयोगटासाठी हा मेळावा असून शैक्षणिक कागदपत्रांसह युवकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
१४ आणि १५ फेब्रुवारी रोजी दोन दिवस मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर होईल. त्यात सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. जे रुग्ण पूर्ण उपचार घेणार असतील. त्यांच्यासाठी तपासण्या मोफत केल्या जातील. शस्त्रक्रियेसाठी लागणा-या सर्व तपासण्या, रक्ताच्या तपासण्या मोफत केल्या जातील.
याशिवाय नेत्र तपासणीही केली जाणार असून अल्प दरात चष्मे वाटप केले जाणार आहे. हे दोनही कार्यक्रम रेड स्वस्तिक सोसायटी आणि कर्तव्यम् सोशल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने होत असून थेरगावातील एच.पी.पेट्रोल पंप पद्मजी पेपर मिल येथे होणार आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्वान व आदर्श व्यक्तीमत्वांचा सन्मान केला जाणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होणार आहे. तर, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पिंपरी-चिंचवड श्री २०२२ जिल्हास्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याचे नियोजन सुनील पाथरमल यांच्याकडे असून प्रेक्षागृहातच ही स्पर्धा पार पडणार आहे.