पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये महापालिकेच्या शाळांचा निकाल ८९ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकाल काहीसा घटला आहे.
महापालिका शाळांतील १८ मुलांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची परिस्थिती आर्थिक बेताची असल्याने ते एक लाखाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत. या १८ विद्यार्थ्यांपैकी आकुर्डी शाळेतील १४ विद्यार्थी लखपती होणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहराचा दहावीचा निकाल ९७.३ टक्के लागला आहे. पिंपरी महापालिकेच्या वतीने अठरा शाळांचा निकाल ८९ टक्के लागला आहे. त्यात क्रीडा प्रबोधिनी, खराळवाडी शाळा, पिंपळे सौदागर शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना शालेय शिक्षण मोफत दिले जाते.
तसेच ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या मुलांना पंचवीस हजार, ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या मुलांना ५० हजार, तर नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या मुलांना एक लाखाचे बक्षीस दिले जाते. यंदा महापालिका शाळांतील पंचवीस हजारांचे बक्षीस ७३ मुलांना, पन्नास हजारांचे बक्षीस ४० मुलांना, तर एक लाखांच्या बक्षिसासाठी १८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
आकुर्डी शाळेतील २० विद्यार्थ्यांना बक्षीस
महापालिकेच्या आकुर्डी शाळेतील सर्वाधिक १४ विद्यार्थ्यांना एक लाखांचे बक्षीस मिळणार आहे. याच शाळेतील ५ विद्यार्थी ५० हजारांचे बक्षीस आणि पंचवीस हजारांचे बक्षीस मिळविणारा एकजण आहे. याचा अर्थ एका आकुर्डी शाळेतील २० विद्यार्थी बक्षिसासाठी पात्र ठरले आहेत. महापालिकेच्या पिंपळे गुरव शाळेस २९, फुगेवाडी महापालिका शाळेस १५, भोसरी महापालिका शाळेस १४ बक्षिसे, वाकड शाळेस १२ आणि काळभोरनगर शाळेतील ९ विद्यार्थी बक्षीसास पात्र ठरले आहेत.