पिंपरी (Pclive7.com):- देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा पुनागेट समोरील कचरा डेपोत आणून टाकला जातो. या कच-यास वारंवार आग लागते, या आगीमुळे त्याच्या धुराचा उग्र वासाचा त्रास निगडी परिसरातील रहिवाशांना होऊ लागला आहे. यामुळे रूपीनगर, तळवडे, से. 22, निगडी गावठाण,साईनाथनगर व यमुनानगरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हा कचऱ्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा, अशी मागणी रुपीनगर नागरी कृती समितीने केली आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20220615-WA0031-300x287.jpg)
याबाबत रुपीनगर नागरी कृती समितीने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा निगडीतील रूपीनगर जवळील मोकळ्या माळरानावर कचरा डेपो आहे. याठिकाणी देहूरोड परिसरासह निगडी भागातील काही हॉटेलचा ओला कचराही टाकला जातो. कचरा डेपोला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहेत.
शुक्रवारी या डेपोला मोठी आग लागली होती. निगडीसह यमुनानगर भागातही धुराचे लोट दिसत होते. ही आग अजूनही धुमसत आहे. धुराचा वास उग्र असून हा धूर आरोग्यासाठी घातक आहे. त्यातून निघणा-या धुरामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रूपीनगर, तळवडे, से. 22, निगडी गावठाण,साईनाथनगर व यमुनानगरच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हा कचरा डेपोच येथून स्थलांतरित करण्यात यावा,अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.
कृती समितीच्या मागण्यांची दखल घेत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व हा गंभीर प्रश्न लवकरात लवकर सोडण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आजित गव्हाणे,नगरसेवक प्रमोद कुटे, पंकज भालेकर, कृती समितीचे उपाध्यक्ष धनंजय भालेकर, सचिव संदीप जाधव, एस.डी.भालेकर, अरूण थोपटे, रवी सोनवणे, सुखदेव म्हस्के, नाना मालुसरे, दादा सातपुते, आनिल भालेकर, रामदास कुटे, प्रतिक शिंदे, तेजस मालुसरे, देहूरोड कॅन्टोन्मेंटचे सि.ई.ओ चे प्रतिनिधी राजेंद्र सावंत तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंटचे किरण गोटे आदी उपस्थित होते.