पिंपरी (Pclive7.com):- कबुतराच्या ढाबळीची पाहणी करून गेल्याच्या किरकोळ कारणावरून सात ते आठ जणांच्या अल्पवयीन टोळक्यांनी एकाचा खून करण्याचा कट रचला. मात्र, ज्याला मारायचे तो आलाच नाही. त्यानंतर दारूच्या नशेत झिंगलेल्या अल्पवयीन मुलांनी सिगारेट दिली नसल्याच्या किरकोळ वादातून मित्राचाच निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी (दि. ४) दुपारी जुना जकात नाका, मोशी येथे उघडकीस आली.

सुमित सतीश बनसोडे (१५, रा. बनकरवस्ती, मोशी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर, दोघे फरार आहेत. पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एका मुलाची कबुतरांची ढाबळ आहे. डुडुळगाव येथील एक मुलगा त्याच्या ढाबळीवर पाहणी करून गेल्याचा संशय त्याला होता. याचा राग मनात धरून त्यांनी त्या मुलाचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी सोमवारी सकाळपासून मयत सुमित याच्यासह पाच ते सातजण एकत्र जमले.

दरम्यान, ठरलेल्या प्लॅननुसार संशय असलेल्या मुलाला मोशी येथील जुना जकात नाक्याजवळ असलेल्या जंगलात बोलवले. मात्र, डुडुळगाव येथील तो मुलगा आलाच नाही. त्यानंतर सुमित याच्यासह सर्वजण दारूच्या नशेत झिंग झाले. त्यांनी गाण्याच्या तालावर नाचही केला. त्यावेळी एकाने सुमितकडे सिगारेटची मागणी केली. मात्र, त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या मित्रांनी सुमितच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सर्वजण पळून गेले. सोमवारी रात्री सुमित घरी न आल्याने त्याच्या आईने मित्रांकडे शोधाशोध केली. मात्र, तो मिळून न आल्याने मंगळवारी सकाळी पोलिसात तक्रार दिली.

मित्रानेच दाखवले घटनास्थळ
सुमितची आई परिसरात शोधाशोध करीत होती. यातील विशेष बाब म्हणजे एक आरोपी मुलगा देखील सुमितच्या आईसोबत फिरत होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुमित जुना जकात नाक्याजवळ एका झाडाखाली झोपला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असताना सुमितचा खून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित मुलाकडे चौकशी केली असता सात ते आठ जणांच्या टोळक्याने सुमितचा खून केल्याची कबुली दिली.





















Join Our Whatsapp Group