पिंपरी (Pclive7.com):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर २२ येथे वारंवार ड्रेनेज लाईन चोकअप आहे. येथील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षापासून याबाबत मागणी करून देखील हे काम सुरू झाले नाही. तरी त्वरित सेक्टर २२ मध्ये अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे कामे चालू करावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी दिला आहे.
सचिन चिखले यांनी याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका ड्रेनेज विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना मागणीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटलयं की, मागील काही वर्षे यमुनानगर भागामध्ये अमृत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लाईन टाकण्याचे काम चालू करण्यात आले. प्रत्येक मुख्य लाईनही बदलण्यात आली. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर २२ याठिकाणी देखील मुख्य रस्त्यावरील लाईनचे काम होणे गरजेचे आहे. अमृत योजनेअंतर्गत हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, या भागात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन चोकअप असतात.
मुख्य लाईन अमृत योजनेअंतर्गत केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अंतर्गत लाईन टाकण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होईल. एकता चौक ते अंकुश चौक, संजय हॉटेल ते अंकुश चौक, पवळे शाळा ते शिवाजी चौक, गणेश हौसिंग सोसायटी मागिल बाजु व इतर सर्व ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन टाकावी. हे काम अमृत योजनेअंतर्गत लवकरात लवकर करून देण्यात यावे. गेले दोन वर्ष यासंदर्भात सतत मागणी करत आहोत. हे काम त्वरित सुरू न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.