पिंपरी (Pclive7.com):- यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे सर्वत्र जल्लोषात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशाच प्रकारे अनोख्या पद्धतीने गणेशोत्सवाचा आनंद घेत रेल्वे प्रवाशांनी गणेशाची आरती केली. सिंहगड एक्सप्रेसमध्ये सकाळी श्रींची आरती मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाच्या सदस्यांनी याचे आयोजन केले होते. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस या रेल्वेने पिंपरी-चिंचवडमधील शेकडो प्रवासी दररोज ये-जा करतात. या प्रवाशांनी संघाच्या माध्यमातून एकत्र येत गणेश पूजन करण्याचे नियोजन केले. त्यानुसार गुरुवारी धावत्या रेल्वेच्या बोगीमध्ये गणेश प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. गणेशाचा यावेळी जयघोष करण्यात आला. संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी आणि सदस्यांनी संयोजन केले. या अनोख्या गणेशपूजनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यासोबतच गणेशभक्तांच्या या भक्तीची चर्चा रंगली आहे. निर्बंधमुक्त वातावरण राहून रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यासाठी यावेळी बाप्पाला साकडे घालण्यात आले.
सर्वच सण उत्सव घरी राहून साजरे करणे अनेक प्रवाशांना सहज शक्य होत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी एकत्र येत या सण-उत्सवांचा आनंद घेतात. त्यानुसार यंदा गणेशोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले आहे. असे प्रवासी संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group