देहू (Pclive7.com):- श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तपदी नाना आनंदबुवा मोरे यांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश मोरे यांनी दिली. ही निवड दोन वर्षांसाठी आहे.
संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे यांची जागा दोन महिन्यांपूर्वी रिक्त झाली होती. या एका जागेसाठी संस्थानच्या वतीने निवडणूक घेण्याचे निश्चित केले होते. यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश मोरे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुजित मोरे व श्यामकांत मोरे यांनी निवडणूक जाहीर केली होती. ही निवडणूक १६ ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ८ ऑक्टोबर पर्यंत होती.
यासाठी नाना मोरे, नीलेश मोरे, सचिन मोरे व रोहन मोरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. मात्र तिघांनी अर्ज माघारी घेतले. निर्धारित वेळेत नाना मोरे यांचा एकमेव अर्ज राहिला. त्यामुळे नाना मोरे यांची बिनविरोध निवड झाली. या बाबतचा औपचारिक निकाल १६ ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती अंकुश मोरे यांनी दिली.