पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आयोजित महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जोगिंदर कुमारने महापौर चषक पटकावला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या कुस्तीमध्ये जोगिंदर कुमारने रेझा हैदरी याचा पराभव करत महापौर चषकाची गदा पटकावली. आमदार महेश लांडगे महापौर नितीन काळजे यांच्याहस्ते मानाची गदा जोगिंदर कुमारला देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आयोजित महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सिने अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेत हिंद केसरीसह १४६ मल्ल सहभागी झाले होते. विवेक ओबेरॉयच्या हस्ते स्पर्धेची पहिली कुस्ती लावून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे बाळासाहेब लांडगे, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणुमंत गावडे आदी उपस्थित होते.
जोगिंदर कुमारने हिंद केसरी आणि भारत केसरी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आहे. तर त्याचा प्रतिस्पर्धी रेझा हैदरी याने आंतराष्ट्रीय ईरान हा किताब पटकावला आहे. या दोघांमध्ये झालेल्या कुस्तीमध्ये जोगिंदर कुमारने विजय मिळवत ही स्पर्धा जिंकली.
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मल्लांबरोबरच राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे, आंतरराष्ट्रीय मल्ल प्रविण मेहता, हिंद केसरी जोगिंदर कुमार, जस्सा भट्टी, भारत केसरी प्रवेश कुमार, कुमार भारत केसर प्रतिक कोंडू, सम्राट केसरी राहूल खाणेकर, भगवंत केसरी महाराष्ट्र राजेंद्र राजमाने, राष्ट्रीय पदक विजेता योगेश तापकीर, किरण भगत, प्रसाद सस्ते, राजू हिप्परकर, उपमहाराष्ट्र केसरी विकास जाधव, युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे, जागतिक विजेता स्वप्निल शेलार, मोतीबागचे बाला रफिक शेख, साईनाथ रानवडे, अहमदनगरचे मल्ल योगेश पवार खेडचे शिवराज राक्षे, मुंबईचे गोपाळ यादव दिल्ली केसरी सत्येंद्र कुमार, हरियाणा दिल्लीचे रविंद्र हरियाणा, पुणे फुगेवाडीचे अभिषेक फुगे दिल्लीचे विनोद कुमार असे एकून ७३ कुस्तीगीर जोड्या व एकूण १४६ मल्ल सहभागी झाले होते.





















Join Our Whatsapp Group