पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डीमधील दत्तनगर व मोहननगर भागात मोठ्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागातील असिस्टंट हॉर्टी सुपरवायजर संजीव प्रल्हाद राक्षे, माळी काम करणारे मच्छिंद्र नामदेव कडाळे, भरत रामभाऊ पारखी यांना निलंबित केले असून, खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

दत्तनगर व आकुर्डीमधील मोहननगर भागामध्ये ठेकेदाराच्या काही कामगारांकडून २० ते २५ मोठी झाडे तोडण्यात आली. या कामगारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही झाडे तोडली असल्याचे सांगितले. त्यामध्ये फायकस १४, पेल्ठाफोरम ६, चिंच १ अशा २१ झाडांच्या फांद्या तोडल्या तर सुबाभूळ व वड अशा दोन झाडांची अवैधपणे वृक्षतोड करण्यात आली. यानंतर या वृक्षतोडीची तक्रार आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांकडे पर्यावरणप्रेमीं नी केली. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. तक्रारीनंतर उद्यान विभागाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
मात्र, एवढ्या वृक्षांची तोडणी झालेली असतानाही अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने प्रशासनावर चौफेर टीका झाली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वृक्षतोड प्रकरणी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. अखेर या वृक्षतोडीमध्ये सहभागी असलेले उद्यान अधीक्षक संजीव राक्षे, माळी काम करणारे मच्छिंद्र कडाळे, भरत पारखी यांना निलंबित करण्यात आले आहे.
अवैध वृक्षतोड केली असून, कर्तव्यामध्ये कसूर करून स्वहितासाठी काम केल्याचा ठपका या तिघांवर ठेवला आहे. त्यांना निलंबित केले असून, दर महिन्याच्या २० तारखेला हजर दाखला द्यावा लागणार आहे. अन्यथा निर्वाह भत्ता देण्यात येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group