पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गोवरचे ३ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिका वैद्यकीय विभागाकडून त्याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे.

मुंबईमध्ये गोवर रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. चिखली-कुदळवाडी परिसरातही लहान मुलांना ताप असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यास अनुसरुन त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. तसेच, खबरदारीची बाब म्हणून वैद्यकीय विभागामार्फत तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो. हा आजार होऊ नये यासाठी ९ महिन्यांचे बालक आणि १६ महिन्यांच्या बालकांना गोवर रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. ही लस मुलांना दिली नसेल तरी पाच वर्षापर्यंत मुलांना ही लस देता येते. सदर लसीकरण विशेषतः दर गुरुवारी तसेच पालिका दवाखाना आणि रुग्णालयाने निश्चित केलेल्या ठिकाणी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणे नसली तरीही बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
शहरामध्ये सद्यःस्थितीत गोवरचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या आजारापासून बचावासाठी आवश्यक काळजी आणि दक्षता महापालिका वैद्यकीय विभागाकडून घेण्यात येत आहे.– डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.






















Join Our Whatsapp Group