पिंपरी (Pclive7.com):- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे प्रभाग रचना तयार करण्यास सांगितल्यामुळे या निवडणुकीत २०१७ च्या प्रमाणे चार सदस्यीय पद्धतीनेच होण्याची शक्यता आहे.
नगरविकास विभागाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (दि.२२) याबाबचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. यात म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मध्ये संदर्भीय अधिनियमानुसार सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे मुदत संपलेल्या आणि नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या/ रचना निश्चित करून प्रभाग रचनेच प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.