पिंपरी (प्रतिनिधी):- महाराष्ट्र बालशिक्षण परिषद तर्फे २७ ते २९ ऑक्टोबर या काळात २४ वे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन सांगवी येथे करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शुभेच्छा संदेशाचे व्हिडीओ कॉन्फ्रन्सव्दारे सादरीकरण होणार आहे. तर उद्घाटन एस.एन.डी.टी. विद्यापीठ,मुंबईच्या माजी कुलगुरू श्रीमती वसुधा कामत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जेष्ठ बालशिक्षण तज्ज्ञ प्रा. रमेश पानसे व स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षी परिषदेतर्फे बालशिक्षण हा केंद्रबिंदू ठेऊन एक राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येते. या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते, शिक्षक, संस्थाचालक, पालक, उपस्थित राहतात. या वर्षीचे हे २४ वे अधिवेशन नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथे २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात बालशिक्षणाचे तंत्र व तंत्रज्ञान हा विषय निवडण्यात आला आहे. या विषयावर अनेक शिक्षक, संस्थाचालक, कार्यकर्ते व शोधनिबंध सादर करणार आहेत. या अधिवेशनासाठी केंद्र सरकारच्या विकास मंत्रालयातर्फे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शुभेच्छा संदेशाचे व्हिडीओ कॉन्फ्रन्सव्दारे सादरीकरण होणार आहे. समारोप राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्र ज्ञानमंडळाचे व्यवस्थापक विवेक सावंत यांच्या उपस्थित होणार आहे.
‘बालशिक्षण’ महत्वाचे असले तरी समाजापासून ते दुर्लक्षित आहे. सध्या बालशिक्षणाचे जे उपक्रम राबविले जातात त्यात शास्त्रीय पध्दतीचा अभाव दिसून येतो. त्याकडे आपल्या संस्थाचालकांनी, शिक्षकांनी, पालकांनी, लोकप्रतिनिधींनी आणि शासनाने पुरेसे लक्ष दिलेले नाही. त्याचा परिणाम देशाच्या भावी पिढीवर प्रतिकूल होत आहे. शिक्षणाविषयक भ्रामक कल्पना बालकांच्या माथी मारल्या जात आहेत. या वातावरणात बालशिक्षण परिषद जनजागृतीचे कार्य गेली २४ वर्षे सातत्याने करीत असल्याचे प्रा. रमेश पानसे म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच हे अधिवेशन होत आहे. यावेळी उपस्थित सदस्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था तसेच कार्यक्रमासाठी संपूर्ण जागा छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सांगवी यांनी केलेली आहे. तरी सर्व शिक्षणप्रेमींनी या तीन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहून शिक्षणाच्या या चळवळीला पाठींबा द्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group