पिंपरी (Pclive7.com):- स्वतःच्या खुनाचा बनाव करण्यासाठी एका नराधमाने दुसऱ्या व्यक्तीचे शिर धडावेगळे करीत, तसेच स्वतःचे कपडे घालून मृतदेह ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटरमशीनमध्ये फिरवून निर्घृण खून केला. संबंधित घटना चऱ्होली खुर्द (ता. खेड) हद्दीत १६ डिसेंबर रोजी घडली असून, नुकताच खुनाचा उलगडा झाला आहे. सुभाष ऊर्फ केरबा छबन थोरवे (वय ६५ रा. चऱ्होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रवींद्र भीमाजी घेनंद (वय ४८), असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी निखिल रवींद्र घेनंद (वय २८, रा. धानोरे, खेड) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत दूर कोठे तरी जाऊन राहायचे होते. यासाठी त्याला त्याच्याच मृत्यूचा बनाव बनवायचा होता. म्हणून त्याने रवींद्र घेनंद यांना विश्वासात घेऊन सुभाष ज्ञानोबा थोरवे यांच्या शेतात बोलावले. कोयत्याने त्यांचे मुंडके कापले, मृतदेहाच्या अंगावर स्वतःचे कपडे घातले, तसेच शेतात काम करावयाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून तो फिरवला. त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव केला. मृतदेहाचे मुंडके, कोयता व अंगावरचे कपडे लपवून ठेवत पुरावा नष्ट केला.
आता सहवास नसला तरी, स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या’ प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील, अशा आशयाचा भलामोठा बॅनर लावून आरोपीचा सातशे ते आठशे लोकांच्या उपस्थितीत दशक्रिया विधी घालण्यात आला. मात्र तो जीवंतच असल्याचे पाहून लोकांना धक्का बसला.
Tags: Murder






















Join Our Whatsapp Group